रात्रीच्या प्रवासात भेटली ती...


रात्रीच्या प्रवासात भेटली ती...


पर्वा घरून फोन आला. कधी येणार आहे गावाला, किती दिवस झाले आला नाहीस, असे आजी फोनवर म्हणाली. उद्या येतो रात्री ड्युटी संपल्यावर, असे मी आजीला फोनवर म्हणालो. आजी बर म्हणाली. आणि फोन ठेवला. बरेच दिवस झाले सोनईला गेलो नव्हतो, म्हणून म्हणलं उद्या ऑफिसचे काम संपवून जाऊ लवकर. ड्युटी दुपारी २ ते १० वाजेपर्यंत होती. अहिल्यानर वरुन सोनई साधारण ४० किलोमिटर आहे. गाडीवर एक तास लागतो जाण्यासाठी. दुसऱ्या दिवशी दुपारी ऑफिसला गेलो. कामाला सुरुवात केली. सहकाऱ्याला सांगितले, आज मला गावी जायचं आहे. रात्री मला थोडं लवकर सोडा, सहकारी हो म्हणाले. मी कामाला सुरुवात केली. रात्री ९ वाजले तरी काम संपले नव्हते... आवरता आवरता पावणेदहाला अखेर काम संपले.



ऑफिसमधून निघालो. तारकपूर बस स्टॅण्डपर्यंत आलो, तेवढ्यात मित्राचा कॉल आला. तो म्हणे बस स्टँडला आहे, ये, बसू घडीभर. त्याला म्हणालो, अरे मी गावी निघालो आहे. तो म्हणे, सोनई किती लांब आहे तवा? ये पाच-दहा मिनिटं. बस स्टॅण्डला गेलो. त्याने दोन मस्त गोड कॉफी सांगितल्या. कॉफी घेता घेता आमच्या जुन्या गप्पा रंगल्या. आमची मैफिल येवढी रंगली कि विचारता सोय नाही. आणि वेळेचेही भान राहिले नाही. पुन्हा दुसरी कॉफी आली. तसे मित्र म्हणाला, आता जेवणच करू. दोन कॉफी संपल्यानंतर शेवभाजी-चपातीची ऑर्डर दिली. बाहेर हलका पाऊस सुरु झाला होता. मित्र म्हणाला, आपलं जेवण संपेपर्यंत उघडेल पाऊस. आमचे जेवण झाले. मोबाईल बघितला, रात्रीचे १२ वाजले होते. मी मित्राला म्हणालो, येतो, खूप उशीर झाला. मंग आम्ही आमच्या गप्पांना पूर्णविराम दिला.



आता मी तारकपुर येथुन सोनईकडे निघालो. हलका पाऊस सुरूच होता. मित्र म्हणाला, एवढ्या रात्री नको जाऊस, उद्या सकाळी जा. त्याला म्हणालो, नको रे, घरचे वाट बघतील. पाऊस शेंडीपर्यंतच असेल, पुढे नसेल पाऊस असे सांगून मी निघालो.जसे जसे पुढे जात होतो, तसा तसा पाऊस वाढत होता. आता मी मात्र भिजलो होतो. गार थंडी वाजू लागली होती. पांढरीपुल घाटाच्या जवळपास आलो. पाऊस हलका पडतच होता. पाऊस आसल्यामुळे रस्त्यावर वाहतूक फार कमी होती. मी दुचाकी हाळू चालवत होतो. तेवढ्यात एक साडी घातलेली महिला रस्त्याच्या कडेला उभी राहून येणाऱ्या गाडीला हात करत होती.



मी विचार केला, एवढ्या रात्री महिला रस्त्यावर एकटी उभी आणि तेही पावसात, नक्कीच काहीतरी अडचण असणार. मी गाडी थांबवली. कुठे जायचं, असे त्या महिलेला विचारलं. ती म्हणाली, तुम्ही कुठे चालले? मी सोनईला. येऊ द्या मंग, मलाही सोनईला. असे ती महिला म्हणाली. गाडीवर बसली. तीच्या हातात एक पिशवी होती. कपाळावर टिकली. हिरव्या बांगड्या, मोरपंखी साडी. आता आमचा प्रवास सुरु झाला..



रात्रीचे एक वाजले होते. पावसामुळे रस्त्यावर गाड्या नव्हत्या. रस्ता शांत होता. आता माझ्या मनात प्रश्नांचे थैमान सुरू झाले. महिला एवढ्या रात्री घाटाजवळ काय करत असेल? आणि सोनईमध्ये कुठे राहत असेल?, घरच्यांशी वाद झाले असतील का? असे नाना प्रकारचे प्रश्न माझ्या मनात होते.



तेवढ्यात ती महिला माझ्या कानाजवळ हळूच म्हणाली, काय विचार करता? मी थोडा शहरलो, कारण ती महिला फरच जवळ बसली होती. मी म्हणालो, एवढ्या रात्री कसे काय निघालात? त्यावर ती महिला म्हणाली, मी रात्रीचाच प्रवास करते, छान वाटते. मला काहीच उमगले नाही, मी म्हणालो आहो.. रात्रीचा एक वाजला आहे. येवढ्या रात्री कोण प्रवास करतं. आणि घरचे काही म्हणत नाही का येवढ्या रात्री? ती महिला म्हणाली, नाही बोलत ते आता..पुर्वी बोलायचे.. लगेच माझ्या लक्षात आले ही महिला त्या टाईपची असेल.. म्हणून मी पण परत काही विचारले नाही.



आता घाट संपतच आला होता. त्यात अजून एक महिला रस्त्याच्या कडेला उभी राहून येणाऱ्या गाडीला हात करताना मला गाडीच्या उजेडातील मंद प्रकाशात दिसली. मी माझ्या गाडीवर बसलेल्या महिलेला म्हणालो, यांना घ्यायचं का हो आपल्या सोबत? ती महिला हो म्हणाली. मी गाडी त्या महिलेच्या जवळ जाऊन थांबवली. कुठे जायचं, म्हणून मी विचारलं. त्यावर ती महिला आणि माझ्या मागे बसलेल्या महिलेकडे पाहून हसू लागली..


मला काहीच समजेना. नंतर माझ्या लक्षात आले या महिला त्याच आहेत. पण मला वाटले रात्री कशाला थांबतील पावसात. मला काहीच समजेना. मला वाटले काहीतरी झोल आहे. निघा इथून, महिला दिसायला सुंदर होती. माझ्या मागे बसलेल्या महिले सरखीच ती दिसायला होती. मी गाडी चालू केली आणि निघायला लागलो. तेवढ्यात माझी नजर उभ्या असलेल्या महिलेच्या पायाकडे गेली.तर त्या महिलेचे पाय उलटे होते. मला क्षणभर काही सुचेनाच.. मला थरारून घाम फुटला होता. मी गाडीचा रेस वाढवला आणि सुसाट गाडी पळवत सुटलो... ती महिला मागून आवाज देत होती. मी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आणि निघून गेलो.



माझ्या काळजाचा ठोकाच चुकला होता. बापरे! आज भलतंच काहीतरी दिसलं आणि थोडक्यात वाचलो असे मी माझ्या मनाशी बोलत होतो. वाचलो, म्हणून मोठा श्वास सोडला... एक ते दोन किलोमिटर पुढे आल्यावर माझ्या पाठीमागे बसलेल्या महिलेने मला विचारलं, का हो.. त्या महिलेला गाडीवर नाही घेतलं..त्या बिचारीला आता गाडी भेटला का? 


मी त्या महिलेला म्हणालो, आहो आपण थोडक्यात वाचलो.. तुम्ही त्या महिलेला बघितले का? माझ्या पाठीमागे बसलेली महिला म्हणाली हो.. काय झालं.. मी म्हणालो, आहो तुम्ही तिचे पाय बिघतले का..?



त्यावर ती महिला मला म्हणाली, तुम्ही माझे पाय बघितले का...?



-तुषार वांढेकर - रिपोस्ट...


प्रवासातील नोंद..

Comments