
विद्यार्थ्यांना मिळाली यशाची गुरुकिल्ली...!
प्रामाणिकपणे प्रयत्न केले की यश आपल्या पायाशी लोटांगण घालतेच. आज त्याच प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा झाला..
सोनई येथील महाराष्ट्र कॉम्प्युटर टायपिंग ॲण्ड शॉर्ट-हॅण्ड इन्स्टिट्यूटच्या १५० हून अधिक विध्यार्थी मागील काही दिवसात प्रशासकीय सेवेत वेगवेगळ्या पदावर रुजू झाले आहेत. लवकरच हा आकडा द्विशतकाकडे जाईल यात काही शंका नाही. आई-वडिलांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवारी (दि. २८) सोनई येथील शनैश्वर मंगल कार्यालयात पार पडला.
कुणी परिस्थितीला तोंड देत; तर कुणी रात्रीचा-दिवस करून तर कोणी आपली परिस्थिती बदलण्यासाठी जिद्दीने परीक्षा देऊन लखलखीत यश मिळवलं. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक व्हावे व इतरांना त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून प्राध्यापक दत्ता हापसे यांनी हा गुणवंतांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.
श्री. डॉ. नंदकुमार बेडसे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ), श्री. संदीप ढोकणे (अवर सचिव, महाराष्ट्र शासन, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई), श्री. प्रकाश गागरे (वरिष्ठ प्रतिवेदक राजपत्रित अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई), श्री. शिवाजीराव कराड (गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती नेवास), श्री. प्रकाश कराळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य संगणक टायपिंग शॉर्टहॅण्ड संघटना), रामचंद्र चव्हाण (लघुलेखन तज्ञ), श्री. धनंजय वाघ (सरपंच, सोनई ग्रामपंचायत), श्री. नानासाहेब बेल्हेकार (संचालक : शनिसमर्थ ग्रामीण सह. पतसंस्था मर्या.) या अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
आज त्या विद्यार्थ्यांचा व्यासपीठावर सत्कार होताना त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. हापसे सर यांनी खेड्यापाड्यातील या रोपट्यांना आकार देत त्यांचे वटवृक्ष तयार केले. विद्यार्थ्यांना शॉर्ट-हॅण्ड व टायपिंगचे महत्व पटवून देत त्यांना मार्गदर्शन करुन अधिकारी होण्यास प्रेरणा मिळाली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील विद्यार्थी शॉर्ट-हॅण्ड व टायपिंगचे शिक्षण घेण्यासाठी सोनईत येतात. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी कोणी क्लासवन अधिकारी झाले तर कोणी क्लास टू अधिकारी झाले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचा संघर्ष व यशोगाथा वेगवेगळी आहे. हापसे सर यांनी हा गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करुन ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा व ऊर्जा देण्याचे काम केले.
जे विद्यार्थी अधिकारी किंवा सरकारी सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता करता टायपिंग, शॉर्ट-हॅण्ड, फोटोग्राफी व इतर व्यावसायिक शिक्षण घेतले पाहिजे. ही बाब अधोरेखीत होते.
-तुषार वांढेकर
Comments