रात्री घराचा दरवाजा वाजला...

 


रात्री घराचा दरवाजा वाजला...


रात्री घराचा दरवाजा वाजला...टक... टक... आम्ही दोघं नवरा-बायको गाढ झोपेत होतो. दरवाजाचा आवाज ऐकून दोघेही दचकून उठलो. बेडरूममधली लाईट लावली. घड्याळात पाहिलं तर रात्रीचा एक वाजला होता.


घड्याळाकडे पाहत असतानाच पुन्हा दरवाजावर आवाज आला. टक... टक... मी आतूनच आवाज दिला, कोण आहे...? बाहेरून कसलाच आवाज आला नाही. पुन्हा... टक... टक...आवाज आला.. आता मात्र आम्ही दोघंही सावध झालो. एवढ्या रात्री कोण आलं असेल? बायको जरा जास्तच घाबरली होती. खरं सांगायचं तर माझ्याही मनात धडकी भरली होती.


माझ्या मनात एक शंका आली... कदाचित चोर असतील? दार उघडलं तर आपलं काही खरं नाही.  बाहेर किती जण असतील? त्यांच्याकडे काही हत्यार असले तर? असे अनेक प्रश्न डोक्यात येत होते. तेवढ्यात पुन्हा दरवाजा वाजला. टक... टक... यावेळी दरवाजा वाजत असतानाच बाहेरून आवाज आला... मला तहान लागली आहे... पाणी द्या...


आम्ही दोघं एकमेकांकडे पाहतच राहिलो. तेवढ्यात किचनमधून अचानक तांब्या पडल्याचा आवाज आला. खणखण.. आता मात्र आमच्या अंगावर काटाच आला. बाहेर दरवाजा वाजतोय... आणि घराच्या किचनमध्ये तांब्या पडतोय.. मी जोरात ओरडलो, कोण आहे...? नाव काय तुझं? बाहेरून आवाज आला, मी भावड्या आहे... मला तहान लागली आहे. पाणी प्यायचं आहे... पाणी द्या..



मी बाहेरची लाईट लावली. शेजारी राहणाऱ्या कुलकर्णी काकांना फोन लावला. पण त्यांनी फोन उचलला नाही. किचनमध्ये जाण्याचीही आमची दोघांची हिंमत होत नव्हती. पुन्हा काकांना फोन लावणार, तेवढ्यात बायको म्हणाली, आहो, ते घरी नाहीत. ते दुपारीच गावी गेले आहेत. त्यांच्या घराची चावी आपल्याकडे ठेवली आहे. तेवढ्यात पुन्हा दरवाजावर आवाज आला. साहेब... दार उघडा... मला तहान लागली आहे. पाणी प्यायचं आहे...



आणि त्याच वेळी किचनमधून पुन्हा भांड्यांचा आवाज आला. मी भीतभीत किचनमध्ये गेलो. पाहतो तर काय... आमची मांजर किचनच्या ओट्यावर बसलेली होतो. माझ्या जीवात जीव आला. पण... बाहेरून पुन्हा आवाज आला. पाणी देता का..? जाऊ..? आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आता मात्र हा प्रकार काही साधा वाटत नव्हता.



आमचे तीन रो-हाऊस शेजारी-शेजारी होते. आमचे शेवटचे, घर होते. पहिल्या घरात अजून कोणी राहायला आलं नव्हतं. दुसऱ्या घरात कुलकर्णी काका आणि तिसऱ्या घरात आम्ही. घर घेऊन आम्हाला दोन महिने झाले होते. पाटील बिल्डरचे दोन प्रोजेक्ट होते. आम्ही राहत होतो तो एक आणि समोर दुसरा प्रोजेक्ट सुरु होता. आजूबाजूला अजूनही घरांचे काम सुरू होते. शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असल्यामुळे चांगल्या भावात घर मिळालं म्हणून आम्ही घेतलं होते. आणि घरापासून गावही जवळ होतं...



मी पुन्हा कुलकर्णी काकांना फोन लावला. यावेळी त्यांनी फोन उचलला. काय झालं तुषार? इतक्या रात्री फोन केलास? काही अडचण आहे का? मी म्हणालो, घराचा दरवाजा कोणीतरी वाजवत आहे. काका क्षणभर शांत झाले. मग म्हणाले, आत्ता..? दार उघडू नका अजिबात. तिकडे चोर येत असतात. अजून म्हणावी तशी वस्ती नाहीये.



बरं... एवढंच म्हणत मी फोन कट केला. तेवढ्यात पुन्हा.. टक.. टक.. आवाज आला.. साहेब.. पाणी द्या ना... लई तहान लागली आहे हो... मी भावड्या आहे. इथेच समोर घराच्या कामावर आहे... त्याच्या आवाजात एक वेगळीच व्याकुळता होती. मला राहवलं नाही. मी किचनमध्ये गेलो. तांब्यात पाणी भरलं. तेवढ्यात बायकोने माझा हात पकडला. आहो, हे काय करताय? मी, पाणी देतो. आहो, हा एकटाच आवाज देतोय... पण बाहेर आणखी लोक असले तर? काय करायचं?



मी थांबलो. तिचा संशय बरोबर होता. पण बाहेरून येणाऱ्या त्या आवाजात मला व्याकुळता वाटत होती.  पुन्हा आवाज आला.. साहेब... दार उघडा ना... लई तहान लागली आहे... मी भावड्या.. आहे हो.! समोरच्या बिल्डिंगमध्ये मिस्त्रीच्या हाताखाली काम करतो. आता त्याचा आवाज अगदी दरवाजाच्या जवळून येत होता.



मी एक दीर्घ श्वास घेतला... आणि थरथरत्या हाताने दरवाजाची कडी काढली. आणि एका झटक्यात दरवाजा उघडला. पण बाहेर कोणीच नव्हतं.. समोर रात्री शुकशुकाट. रस्त्यावर कुणी नाही. आजूबाजूला कुणी नाही. मी इकडे-तिकडे पाहिलं. भावड्या कुठेच दिसत नव्हता. मी पटकन दरवाजा बंद केला. आम्ही दोघंही रात्रभर झोपलो नाही. पहाटे कधीतरी डोळा लागला. सकाळी आठच्या सुमारास बायकोने मला उठवलं. आहो.. उठा. मी झोपेतच म्हणालो, काय झालं? ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, दारात बघा.. काय आहे..



मी उठलो. दरवाजा उघडून बाहेर पाहिलं.. दारासमोर सिमेंटने भरलेल्या पावलांचे ठसे होते. ते ठसे दारापर्यंत आलेले आणि गेलेले होते.. मी काही क्षण त्या ठशांकडे नुसता पाहत राहिलो. मग बायकोकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरही भीती स्पष्ट दिसत होती. पण त्या रात्री नेमकं काय झालं होतं, याचं उत्तर आम्हाला काही दिवसांनी मिळालं..



समोरच्या एका बिल्डरच्या साईटवर काम सुरू असताना स्लॅब कोसळला होता. त्यात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला होता. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे... तो कामगार स्लॅब कोसळला त्यावेळी पाणी पीत होता. स्लॅब त्याच्या अंगावर कोसळला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे ऐकल्यावर माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला.



त्या रात्री दरवाजावर पाणी मागणारा आवाज... साहेब... पाणी द्या ना... लई तहान लागली आहे... तो आवाज.. येत होता.पण त्या माणसाला आम्ही पाहिल नाही... पण सिमेंटने भरलेले पावलांचे ठसे मात्र आम्ही दोघांनीही पाहिले..




-तुषार वांढेकर

२३/०९/२०२६

Comments