अहो.. आमच्या घरच्यांना निरोप द्याल का..?
मागच्या सोमवारी सकाळी आठलाच नगरवरून कामानिमित्त सोनईला गेलो होतो. दुपारी ४ पर्यंत सोनईमधील सर्व कामे उरकून घेतली. ऑफिसला यायचं होतं म्हणून, परत साडेपाच वाजता परतीच्या प्रवासाला नगरला निघालो.
घोडेगावमध्ये आल्यावर गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतले व कानामध्ये हेडफोन टाकून मस्त गाणे ऐकत निघालो.
आभाळ काळकुट्ट भरून आले होते. गार वारा सुटला होता. कुठेतरी पाऊस झाल्याने मातीचा सुगंध येत होता... गाण्याच्या तालावर माझा प्रवास नगरकडे सुरू होता.
पावसाचे वातावरण तयार झाले होते. चहा घेण्याची इच्छा झाली. मग काय, लगेच गाडी एका हॉटेलवर थांबवली आणि कडक चहा घेतला. आणि पुढे प्रवास सुरू झाला...
पांढरीपुल घाटात दोन तरुण रस्त्याच्या कठड्यावर बसले होते. डोक्याला भगवा पंचा, हातात कावडीचे पाणी होतं. ते नगरकडे जाणाऱ्या गाडीला हात करत होते. पण गाडी थांबत नव्हती. त्यांनी मलाही हात केला. मी गाडी त्यांच्याजवळ थांबवली आणि विचारलं, यायचे का नगरला..?
त्यांनी सांगितलं, नाही. मग मी विचारलं, हात का केला..?
त्यांनी सांगितले, आम्ही नगरचे आहोत.. आमच्या येथे देवीची जत्रा आहे. त्यासाठी गंगेचे पाणी आणण्यासाठी आम्ही प्रवरा संगम येथे गेलो होतो. येताना पायी आलो आहोत.. आमचे बाकी मित्रमंडळी पुढे गेले आहेत... आम्ही दोघेच पाठीमागे राहिलो आहोत.. आमच्या पायाला प्रचंड फोड आले आहेत. आम्हाला आता चालणं होत नाही. आमचे कपडे व मोबाईल त्या मित्रांसोबत पुढे गेले आहेत.
मी म्हटलं, बरं मग…
तर ते म्हणाले, तुम्ही नगरला चालले आहेत तर आमच्या आई-वडिलांना निरोप द्या. तुमचे मुलं घाटामध्ये बसले आहेत. त्यांच्या पायाला फोड आले आहेत. त्यांना चालणं होत नाही. त्यांनी मोठी गाडी घेऊन बोलावलं आहे. एवढा निरोप आमच्या घरच्यांना द्या हो.. त्यांनी विनंती केली.. व सोबत घरचा पत्ताही सांगितला..
मला त्यांची अवस्था बघून वाईट वाटलं. मी, तुमच्या घरच्यांना पाठवून देतो, असे सांगून तिथून निघालो...
मला ऑफिसला येण्याची घाई असल्याने मी जास्त विचारपूस न करता नगरकडे निघालो. नगरमध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर मी त्यांच्या घरी गेलो.
दारात जाऊन बेल वाजवली….! घरातून एक महिला आली.. कोण पाहिजे म्हणून विचारलं..?
अमुक अमुक इथेच राहतात का, म्हणून मी त्यांना विचारलं..?
हो, म्हणून त्या बाईने सांगितलं..
मी त्यांना सांगितलं की, तुमचे मुलं पांढरीपूल घाटामध्ये बसले आहेत. त्यांच्या पायाला फोड आले आहेत. त्यांनी तुम्हाला नेण्यासाठी मोठी गाडी घेऊन बोलवले आहे.
माझं बोलणं ऐकल्यानंतर त्या बाई मोठ्याने 'अहो' म्हणून ओरडल्या आणि रडायला सुरुवात केली.. घरामधून एक माणूस बाहेर आला व त्याने विचारलं, काय झालं..?
'ती' बाई म्हणाली, हे काय म्हणतात ते पहा..!
मी त्यांना जसाचा तसा निरोप सांगितला.. त्यांनी मला घरात बोलावलं.. मला बसण्यासाठी विनंती केली. त्या बाई रडत होत्या. मलाही काही कळेना, नेमकं झालंय काय..?
मी त्यांना सांगितलं, तुमचे मुलं व्यवस्थित आहेत. फक्त त्यांच्या पायाला फोड आले आहेत. त्यांना चालणं होत नाही, म्हणून त्यांनी मला निरोप पाठवण्यासाठी सांगितले आहे.
तेव्हा 'तो' माणूस मला म्हणाला, समोर पहा..
मी समोर बघितलं तर.. जे मुलं मला घाटात भेटले होते, त्या दोघांचा फोटो एका भिंतीवर होता व त्या फोटोंना हार लावलेला होता.
आमच्या मुलांचा सात वर्षांपूर्वी अपघात झाला आहे... दोघेही जागीच गेले.... दरवर्षी याच दिवशी आमच्या घरी कोणी ना कोणी हा निरोप घेऊन येत असतो.. आज तुम्ही आलात..
हे सांगताना त्या माणसाच्या आणि त्या बाईच्या डोळ्यातून पाणी येत होते….
आणि मी लटलट कापत होतो. माझे हातपाय थंड पडले होते.
तेवढ्यात 'तो' माणूस म्हणाला.. तुम्ही आता जेवण करून जा...
तुमचं जेवण राहू द्या, मला घाम फुटलाय, असं म्हणत मी तिथून पळून आलो...
- तुषार वांढेकर
Comments